घ्या… खुद्द ‘जलसम्राट’ उतरताहेत रस्त्यावर
दीपक शेळके जालना – कशासाठी..? पाण्यासाठी आज काँग्रेसचे आंदोलन आहे. पाणी संकट हे जालनेकरांची पाठ सोडायला तयार नाही. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजना पुर्ण झाली आणि […]
दीपक शेळके
जालना – कशासाठी..? पाण्यासाठी आज काँग्रेसचे आंदोलन आहे. पाणी संकट हे जालनेकरांची पाठ सोडायला तयार नाही. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजना पुर्ण झाली आणि जालनेकरांनी या संकटापासून सुटका मिळण्याची आशा धरली. मात्र, शहरांतर्गत जिर्ण होत चाललेली जुनी पाईपलाईन आणि जलकुंभ यामुळे ही योजना पुर्ण झाल्यानंतरही नियमित आणि दररोज हवा असलेला पाणी पुरवठा शक्य झाला नाही. कालांतराने शहरांतर्गत पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्णत्वास गेली असली तरी आजही जालनेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणी टंचाई जैसे थेच आहे. या टंचाईला जबाबदार नेमके कोण? हा वेगळा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरेल. तुर्तास या टंचाईसाठी आता खुद्द आमदारच नव्हे तर जलसम्राट म्हणून ओखळले जाणारे कैलास गोरंट्याल यांनी दंड थोपाटले असून ते या टंचाई विरोधात पर्यायाने पालिकेच्या प्रशासकीय कारभाराविरोधात रस्त्यावर उतरच आहेत. त्यांच हे आंदोलन गुरुवार (दि 20) रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार असून त्याचे फलीत जालनेकरांना मिळावे एवढीच माफक अपेक्षा.
आमदार कैलास गोरंट्याल हे काँग्रेसजनातच नव्हे तर जिल्ह्याभरात ‘जलसम्राट’ या नावाने परिचित आहेत. जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजना ही आ. गोरंट्याल यांच्यामुळेच पुर्ण झाल्याचा दावा करण्यात येतो. मुळात भास्कर अंबेकर हे नगराध्यक्ष असतांना जायकवाडी योजनेसाठी प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानंतर अर्जुनराव खोतकर यांनी आमदार असतांना आपली आमदारकी पणाला लावून योजनेला मंजुरी मिळवून घेतली आणि त्यानंतही योजना पुर्ण होत नाही म्हणून अभयकुमार यादव यांच्यासह अनेकांनी थेट मा. न्यायालयाचे दार ठोठावले होते. सोबतच कैलास गोरंट्याल यांनी जायकवाडी योजनेसाठी स्वपक्षीय सरकार असतांना रेल्वे रोकोसह स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जावून आंदोलनात्मक पावित्रा उचलला होता. इतकेच नव्हे तर केेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे खासदार असतांना त्यांनी या योजनेच्या मंजुरीसोबतच ती पुर्णत्वास जाण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सोबतच जायकवाडी योजना आणि तिच्याशी सलग्न असलेली शहरांतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजुर करून आणण्याकरीता खा. रावसाहेब दानवे यांनी शासन दरबारी आपले वजन वापरले. हे सर्वश्रुत आहे. एकंदरीत योजनेच्या मंजुरीचे श्रेय हे सर्वांचेच असतांना ते ‘जलसम्राट’ म्हणून घेत स्वतःपुरते मर्यादीत ठेवले. आणि गेली सात- आठ वर्षांपासून आ. गोरंट्याल यांच्या नावापुर्वी जलसम्राट लावण्यात येत आहे. मधल्या काळात नगर परिषद काँग्रेसकडे असतांना पाणी पुरवठा हा आठ-आठ दिवसांआड होत असत. त्यातही खंड होताच. असे असतांनाही पाणी पुरवठा सभापती म्हणून कारभार सांभाळणार्या पुनमताई राज स्वामी यांनी जालनेकरांना अखंडीत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे ही खरेच. गेल्या वर्ष-दीड वर्ष पालिकेवर प्रशासक आहे. या प्रशासकांच्या कार्यकाळातही वर्षभर आठ-आठ दिवस पाणी पुरवठा नियमित होत होता. मात्र, गेल्या महिना-दोन महिन्यांपासून यात खंड पडला आणि जालनेकरांसमोर पुन्हा पाणी संकट उभे ठाकले आहे. या पाणी संकटाचा संपुर्ण दोष प्रशासकीय कारभारावर देण्यासाठी म्हंटल्यास वावगे ठरणार नाही हा आंदोलनाचा पावित्रा काँग्रेसकडून घेण्यात आलेला दिसून येतो आहे. काहीही असो, पाण्यासाठी जलसम्राट आंदोलन करणार आहेत. त्यांचे हे आंदोलन यशस्वी ठरो आणि जालनेकरांना पुन्हा किमान आठ दिवसांआड पाणी पुरवठा होवो एवढीच अपेक्षा…