शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमींची मागणी; नागपूर दंगलीला मुख्यमंत्री-गृहमंत्री जबाबदार - डॉ. लाखे पाटील
जालना । प्रतिनिधी - शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना केलेली वक्तव्ये ही त्यांच्या संस्कृती दाखवते, त्यांना सरकारने तात्काळ अटक केली नाही. ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारांवर कारवाई होते, तसे न करता त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही सरकारच्या मर्जीतल्या हिंदुत्ववादी संघटनांना पुढे करून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी ही केवळ मराठा सामाज्यांचा सर्वश्रेष्ठ इतिहास मिटविण्याचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला आहे. नागपूर येथील दंगलीला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचेही डॉ. लाखे पाटील यांनी येथे म्हटले आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यकर्ते बेजबाबदार प्रक्षोभक विधाने करत आहेत. मराठ्यांच्या व रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याची निशाणी उखडून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सरकारला जर कबर हटवायची असेल तर त्यांनी स्वतः कुदळ हाती घ्यावे, धर्मा-धर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करू नये, भारतीय पुरात्तव विभाग आणि निती आयोगाच्या शिफारशीने देशातील 18 पुरातत्व स्थाने वगळल्या गेली. त्याचप्रमाणे कायद्यानुसार औरंगजेबाची कबर सरकारने हटवावी. सध्या राज्यात व देशात त्यांचीच सत्ता आहे. नाहक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, सामाजिक सोहार्द संपेल आणि गल्लीबोळात दंगे होतील अशी बेजबाबदार वातावरण निर्माण करु नये.
छावा चित्रटपटाने चांगला गल्ला जमवला आहे, मात्र, यात इतिहासाची तोड-मोड करून पुढे आणला आहे. हे सर्व स्क्रिप्टेड आहे. शिर्के घराण्यांचा खोटा इतिहास दाखविण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रुर मृत्यू ला कारणीभूत असलेल्या सल्लागार वर्गाचा सहभाग लपविला आहे. सिनेमाची कथा म्हणजे इतिहास नाही याचे भान ठेवून वक्तव्य करण्यात यावीत असा सल्ला देखील डॉ. लाखे पाटील यांनी यावेळी राज्यकर्त्यांना दिला.
सर्वसत्ताधीश मुघल बादशहा औरंगजेब याला झुंजवत याच भुमीत गाडला आणि मुघल सल्तनत खिळखिळी करून टाकली अशा मुघलमर्दिनी रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचे भव्य अश्वारुढ स्मारक मुंबई मंत्रालयासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभी करावीत. त्यांचा फोटो मंत्रालय प्रवेशद्वार व सर्व शासकीय कार्यालयात तातडीने लावण्यात यावेत. शालेय, महाविद्यालय, संशोधन अभ्यासक्रमात छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याचा इतिहास सामाविष्ट करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
रणरागिणी छत्रपती ताराराणी व छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे सातारा येथे उच्च दर्जाचे समाधीस्थळे उभारावीत. सरकारने समाधीस्थळे उभारली नाहीत तर मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमी संघटना स्वराज्यसेवा म्हणून श्रम,धनदान करून त्यांची दर्जेदार समाधीस्थळे उभारेल.
दिल्लीच्या तालकटोरा येथे मराठा वीर पेशवा बाजीराव पहिला, श्रीमंत महादजी शिंदे, श्रीमंत मल्हारराव होळकर यांची स्मारके उभारण्याची सुचना एकनाथ शिंदे, शरद पवार यांनी केली आहे. यातून छत्रपती शंभुपुत्र शाहू महाराज यांना वगळले जात आहे. हे अनाकलीय असून ही एकप्रकारे मराठा इतिहासाची मोडतोड होत आहे? त्याठिकाणी छत्रपती शंभुपुत्र शाहू महाराज यांच्या स्मारकाची मागणीही डॉ. लाखे पाटील यांनी केली.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि सावरकर स्मारकचे रणजित सावरकर यांच्या साहित्यातून बेजबाबदार, बदनामीकारक लिखाण वगळण्यात यावे व त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात यावी व बदनामीकारक भाग पुढील आवृत्तीत सामाविष्ट करू नये अन्यथा कायदेशीर न्यायालयीन लढा देण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला.

About The Publisher
