घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ – मंत्री अतुल सावे; विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मंत्री सावे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सध्या चार टप्प्यांमध्ये १.२० लाख रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून देण्याबाबत तसेच या घरकुलांना पाच ब्रास वाळू देण्याबाबत देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ३२९ लाभार्थ्यांची नोंदणी आवास सॉफ्ट प्रणालीवर करण्यात आली असून त्यापैकी २४१ लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी १७१ लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांची पी एफ एम एस प्रणालीवर बँक खाते पडताळणी प्राप्त होताच पहिला हप्ता वितरित करण्यात येईल, असे सावे यांनी यावेळी सांगितले.
वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकल्प कार्यान्वित होणार – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. १९: राज्यातील वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्याने नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. तसेच भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात महानिर्मितीचे पाच संच बंद असल्याने विजेचा तुटवडा निर्माण होत असल्याबद्दल सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, वीज निर्मिती संच बंद असण्याची ही पहिली वेळ नसून नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी काही संच बंद ठेवावे लागतात तसेच तांत्रिक बिघाडांमुळे काही संच बंद राहतात.
प्लान्ट लोड फॅक्टर (PLF) बाबत महाराष्ट्राचा दर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च दर आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 2030 पर्यंत काही जुने प्रकल्प चालू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे सरकार आणि खासगी वीज निर्मिती कंपन्यांची तुलना योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, जानेवारी महिन्यात 82.5 दशलक्ष युनिट वीज खरेदी करण्यात आली असून तिचा दर 3.31 रुपये प्रति युनिट होता. हा दर खासगी कंपन्यांच्या तुलनेत अधिक नव्हता. तसेच, सरकारकडील जुने वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत केले जात आहेत. भुसावळ येथे 660 मेगावॅटचा नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून, चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचा प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
कल्याण येथील विशाल गवळीवरील गुन्हा दाखल प्रकरणी पोलीस विभागाकडून हलगर्जीपणा नाही – गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १९: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आरोपी विशाल गवळी याच्यावर विनयभंग व इतर असे एकूण नऊ गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी विशाल गवळी व अन्य पाच ते सहा गुन्हेगारांनी मानसिक रुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राआधारे विनयभंग, छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळविल्याचे आढळून आलेले नाही. तसेच याप्रकरणी पोलीस विभागाने हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे त्याबाबतची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य ॲड. अनिल परब यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, विशाल गवळीवर एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्ह्यांमध्ये जामीन प्राप्त झालेला आहे. तर, एका गुन्ह्यामध्ये विशाल गवळी सध्या अटकेत आहे. त्यास मानसिक रुग्ण म्हणून जामीन मिळालेला नाही. गवळीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्यावर एमपीआयडी सारखा गुन्हा दाखल करता येईल का, हे देखील तपासून पाहिले जाईल, असेही गृह राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

About The Publisher
