उष्माघात जीवघेणा ठरु नये यासाठी, अशी घ्या काळजी…
उष्मलाटेचा अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या ४.५ अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात व ६.४ अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्यास तीव्र उष्णतेची लाट म्हणतात. जागतिक स्तरावर युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका या ठिकाणी वेगवेगळे निकष आहेत. कारण त्या त्या भागातील सर्वसाधारण हवामानाची स्थिती ही वेगवेगळी असते.

उष्माघात हा एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे जो शरीराच्या तापमानाचे नियंत्रण यंत्रणा (Thermoregulation) असफल झाल्याने होतो. प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान १०४°F (४०°C) किंवा त्याहून अधिक होते, ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.
उष्माघाताची कारणे:
उष्माघात मुख्यतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो.
श्रम संबंधित उष्माघात (Exertional Heat Stroke):
शारीरिक श्रम करत असताना, विशेषतः उन्हात काम करताना किंवा व्यायाम करताना होतो.
खेळाडू, मजूर, शेतकरी यांना धोका अधिक असतो.
अश्रम संबंधित उष्माघात (Non-exertional Heat Stroke):
दीर्घकाळ प्रखर उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्यास होतो.
लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, तसेच ज्या लोकांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रण कमी असते त्यांना याचा जास्त धोका असतो.
उष्माघाताची लक्षणे पटकन ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
- शरीराचे तापमान १०४°F (४०°C) पेक्षा अधिक
- घाम येणे थांबते (कोरडी त्वचा)
- चक्कर येणे आणि थकवा
- डोकेदुखी, मळमळ, उलट्या
- हृदयाचे ठोके वाढणे (Tachycardia)
- भान हरपणे, गुंगीत जाणे किंवा बेशुद्धावस्था
- हात-पाय मुरगळणे किंवा झटके येणे.
उष्माघाताचा धोका पुढील गटांसाठी अधिक असतो:
वयोवृद्ध आणि लहान मुले, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण,मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी,खेळाडू आणि सैन्यातील जवान.
उपाय आणि उपचार
उष्माघात झाल्यास खालील गोष्टी त्वरीत करा:
- व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवा.
- कपडे सैल करा आणि शरीरावर थंड पाणी शिंपडा.
- बर्फाच्या पिशव्यांचा उपयोग करून मान, बगल आणि मांड्यांवर शेक द्या.
- थंड पाणी पाजण्याचा प्रयत्न करा, पण बेशुद्ध व्यक्तीला पाणी पाजू नका.
- तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
रुग्णालयात पुढील उपचार केले जातात:
- Intravenous (IV) fluids देऊन शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढणे.
- शरीराचे तापमान कमी करण्यासाठी विशेष शीतकरण तंत्र वापरणे (जसे की आईस बाथ किंवा ओले कपडे गुंडाळणे).
- हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांचे निरीक्षण.
उष्माघात टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या:
- भरपूर पाणी प्या
- जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या.
- हलके आणि सैलसर कपडे परिधान करा
- उष्ण हवामानात सुती कपडे घाला.
- थेट उन्हापासून बचाव: शक्यतो दुपारच्या वेळेस (११ ते ४) बाहेर जाणे टाळा.
- शारीरिक श्रम कमी करा: प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा.
- योग्य आहार घ्या: फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.
उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे ओळखणे, तातडीने कृती करणे आणि योग्य प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे.
- संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, रायगड

About The Publisher
