बांधकाम व्यावसायिकाला १४.८९ कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपीस बिहार मधून अटक
शेअर मार्केट मध्ये जास्तीचा नफा आला अंगलट
On
युवा आदर्श : पनवेल
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुजितकुमार सिंग याने आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींनी २०२४ मध्ये संगनमत करुन खारघर भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगमध्ये जास्तीचा फायदा असल्याचे भासवले होते. तसेच त्यात जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यवसायीकाकडून ऑनलाईन पध्दतीने तब्बल १४ कोटी ८९ लाख रुपये उकळले होते. याबाबत नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर टोळी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासात आरोपी सुजितकुमार हा बिहार येथे असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात जावून सुजितकुमार सिंग याला ताब्यात घेतले. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो दोन वेळा कंबोडिया देशात गेल्याचे आणि त्याचा या गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने या आरोपीची ५ दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी सुजितकुमार सिंग भारतातील इतर काही व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्या आरोपींचा सायबर पोलिसांकडुन शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत. दरम्यान, सुजितकुमार सिंग जून २०२३ ते जून २०२४ या कालावधी दोन वेळा कंबोडिया देशात गेल्याचे आणि तेथील चाईनीज लोकांच्या संपर्कात राहून तेथील कॉल सेंटरमध्ये काम करुन भारतात राहणाऱ्या अनेक नागरिकांची सायबर फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच सुजितकुमार सिंग विविध टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून चाईनीज लोकांच्या संपर्कात असल्याचे तसेच त्याने भारतातील सिमकार्ड खरेदी करुन कंबोडिया देशातील साथीदारांना पुरविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पुन्हा तो कंबोडीया देशात जाण्याच्या तयारीत असताना, सायबर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.


Tags:
About The Publisher
