अमर हबीब; उठाव निर्माण करणारे आंदोलक-साहित्यिक
झेंडा भल्या कामाचाजो घेउनी निघाला…काटं कुटं वाटं मंदी बोचती त्येला…रगत निगल तरी बी हसलं,शाबासकी त्येची…तू चाल पुढं तुला रं गड्या…भीती कशाचीपर्वा बी कुनाचीपहिल्या मृदगंध साहित्य […]
झेंडा भल्या कामाचा
जो घेउनी निघाला…
काटं कुटं वाटं मंदी बोचती त्येला…
रगत निगल तरी बी हसलं,
शाबासकी त्येची…
तू चाल पुढं तुला रं गड्या…
भीती कशाची
पर्वा बी कुनाची
पहिल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, किसानपुत्र आंदोलन प्रणेते, प्रगल्भ अभिनेते, आमचे मार्गदर्शक अमर (काका) हबीब म्हणजे एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व!
अमर काकांची जीवनशैली त्यांच्या मुल्यांवर आधारित आहे. त्यांची मूल्ये सत्य-सचोटीच्या प्रयोगातून जन्माला आली आहेत. विकसित झाली आहेत. एका अभ्यासकाच्या भूमिकेतून शेतीनिष्ठ विचारधारा किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून काकांनी उलगडून दाखविली आहे. एका शिक्षकाने विषय समजावून द्यावा, तशी आत्मीय तटस्थता त्यांनी स्वीकारली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला ते सर्वोच्च प्राधान्य देतात.
अंबाजोगाई मध्ये शिक्षण घेत असतांना विविध शैक्षणिक- सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून आमचा परिचय झाला. आमच्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवा विकसित करण्यात काकांचे बहुमोल योगदान आहे.
शालेय शिक्षण घेत असताना ते राष्ट्र सेवा दलाकडे खेचले गेले. 1974 ला मराठवाडयात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. आणीबाणीचाही त्यांनी निषेध केला. मिसाखाली अटक होऊन त्यांनी 19 महिने तुरुंगवास भोगला. ‘छात्र-युवा संघर्ष वाहिनी’ या संघटनेतही अमर हबीब यांनी सहभाग घेतला. 1980 पासून त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी ग्रामीण समुदायाच्या समस्या समजून घेतल्या. गावोगावी भटकंती करून शेतकरी चळवळीचा विचार शेतकर्यांपर्यंत पोहचविला. अंबाजोगाईला ज्वारी परिषद घेतली. ‘भूमिसेवक’ हे साप्ताहिक चालवले. आंबेठाण येथे राहून संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले. त्यांनी शेतकरी प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. अलीकडे त्यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून किसानपुत्रांचे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अनेक लेख, कविता व ग्रंथ लिहिले. ’खरी कमाई’, ’नाते’ व ’कलमा’ ही पुस्तके वाचकप्रिय आहेत. अनेक ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत. तसेच ‘शेतकरीविरोधी कायदे’ ही पुस्तिका लिहिली आहे. या छोट्या पुस्तिकेने शेतकरी आंदोलनाला दिशा दिली आहे.
अमर हबीब यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. 2013 साली अमरावती येथील ’आम्ही सारे’ फाऊंडेशनने सामाजिक कामाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला. मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईने 2022 मध्ये ’मंदाताई देशमुख कथा लेखक पुरस्कार’ देऊन गौरविले. लातूर येथील ’संत तुकाराम साहित्य पुरस्कार’ ही त्यांना मिळालेला आहे. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
अमर काका जयपकाश नारायण यांची छात्र-युवा संघर्ष वाहिनी, साने गुरुजीचे राष्ट्रसेवा दल व आंतरभारती, ते समाजवादी परिवारात वावरत असत. त्यांचा दिल्ली ते अंबाजोगाई प्रवास असे. जयपकाश नारायण यांनी आंदोलन सुरु केले. त्या आंदोलनात त्यांचा सक्रिय पाठिंबा व सहभाग होता. त्यांच्याबरोबर त्यांनी काम केले.
अंबाजोगाई मध्ये विविध सामाजिक मागण्यासाठी नेहमी संघर्ष होत असे. त्या संघर्षात ते नेहमी अग्रेसर असत. सोबत डॉ. द्वारकासजी लोहिया (बाबुजी), नरहरी कचरे, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे, अशोकराव देशमुख (माकेगावकर), अरुण पुजारी, कमलाकरराव देशमुख, राम मुकद्दम, संभाजीराव जोगदंड अशोक गुंजाळ, डॉ. व्यंकटराव डावळे, जगन्नाथ जोगी, डॉ. शैलाताई लोहिया अशा अंबाजोगाईतील मान्यवर व्यक्तीबरोबर ते विविध सामाजिक प्रश्नावर संघर्ष करीत. ही सर्व मंडळी समाजवादी व डाव्या विचारसरणीची होती. डॉ. बापुसाहेब काळदाते, नारायण (दादा) काळदाते, अंकुशराव काळदाते, अण्णासाहेब खंदारे, जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन अशी मंडळी सोबत असायची. आणखी अंबाजोगाईतील सर्व क्षेत्रातील मंडळी सोबत होती.
1975 ला माजी पंतपधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. वरील सर्व मंडळी काँग्रेसच्या विरोधातील होती व त्यांना हे पसंत नव्हते. जयपकाश नारायण यांचे आंदोलन चालू होते. इंदिरा गांधींनी अटकेचे सत्र सुरु केले. त्याचे लोन बीड जिल्ह्यात आले. अंबाजोगाई शहरात डॉ. लोहिया, अमर हबीब व वरील अनेक लोकांना राजकीय गुन्हेगार म्हणून अटक केली. त्यांचा दोष काय तर काँग्रेस विरोधात बोलणे, मोर्चे काढणे, संघर्ष करणे हा होता. ज्यावेळेस अमर काकांना अटक झाली त्यावेळेस त्यांचे वय फक्त 21 वर्षाचे होते. त्यांना पोलीसांनी सांगितले, ’तुम्हास बीडला जावयाचे आहे. सोबत एक कपड्याची बॅग घ्या.’ त्यांनाही माहित नव्हते कशासाठी जायचे व 18 महिने त्यांना नाशिक येथील जेल मध्ये रहावे लागले. सोबत वरील सर्व मंडळी होती. नंतर लोकसभा निवडणूका झाल्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनता पक्षाचा विजय झाला व त्यांची सुटका झाली. जनता पक्षाचे सरकार आले परंतू त्यांनी स्वत:साठी काही मागितले नाही. जी फाटकी माणसे आहेत, गरीब आहेत अशा लोकांसाठी त्यांनी काम केले. त्यांना सन्मान दिला.
आणीबाणीतून सुटका झाल्यानंतर अमर काका यांचे लग्न झाले. आशा वाघमारे यांच्या सोबत. आशाताई या अमर काकाच्या बहिणीच्या वर्ग मैत्रिण होत्या. त्या दोघींनी औरंगाबाद येथे नर्सिंग शिक्षण पूर्ण केले होते. हा विवाह अगदी साधेपणाने बीड येथे विवाह नोंदणी कार्यालयात डॉ. बापुसाहेब काळदाते, डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) व सुधाकर जाधव यांच्या साक्षीने झाला. विवाह होण्या अगोदर ते बिहार येथे आंदोलनातच होते. विवाह झाल्यानंतर ते अंबाजोगाईला आले. बसचा प्रवास होता. हा आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह होता. या विवाहास त्यांच्या घरुन विरोध होता व सहानुभूतीही होती.
आशाताई ह्या अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे स्टाफ नर्स म्हणून सर्व्हिसला होत्या. दोघांपैकी एकजण नोकरीला असल्यामुळे एक जणाने सामाजिक काम, संघटनेत काम करावे, असे कदाचित त्यांचे ठरले असावे. त्यांच्या मनात आले असते व ते राजकीय पक्षांच्या नेत्या सारखे वागले असते तर ते केंद्रात किंवा राज्यात मंत्री झाले असते. परंतू हे त्यांना मान्य नव्हते. ते स्वाभिमानी कार्यकर्ते, नेते आहेत.
त्यांनी खूप माणसे जोडली. ती सांभाळली, त्यांना सतत मार्गदर्शन केले. सतत नवीन नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात असतात. त्या कल्पना मांडून प्रत्यक्षात आणतात. अंबाजोगाई साहित्य हे एक त्याचे आदर्श उदाहरण आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्यांचे आकडे रोज येत आहेत. याही वर्षी कमी झालेल्या नाहीत. जे आत्महत्या करतात त्यांचे आकडे येतात पण जे रोजच ’मरण’ जगतात त्यांचे काय..? विधानसभा आणि लोकसभेची अधिवेशने झाली. त्यात कोणी साधे दुःख व्यक्त केले नाही. राजकीय स्तरावर क्रूर कोडगेपणा पसरला आहे. मीडिया, नको त्या गोष्टीवर चर्चा करून शेतकर्यांचा आक्रोश दाबून टाकण्यात हातभार लावत आहे. अशा परिस्थितीतून देश जात आहे. आपण काही करू शकतो का..? याचा विचार करून किसानपुत्रांनी ठरवले आहे की, 19 मार्च रोजी आपण सगळे शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करू. 19मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि.यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी, पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. यावर्षी आपण त्यात सहभागी होऊया. अशी संवेदना प्रकट करणारे अमर काका खर्या अर्थाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकेकाळी मुंबईत ‘दलित पँथर’नं ज्याप्रमाणे शिक्षित व नागरी भागातील दलित तरुणांना दलितांच्या प्रश्नांशी जोडलं होतं, त्याचप्रमाणे आज शेतकरी-कुटुंबांतील तरुण ‘किसानपुत्र-आंदोलना’शी जोडले जात आहेत. नितीन राठोड, मयूर बागूल, डॉक्टर आशिष लोहे, संगीता देशमुख, मकरंद डोईजड, संदीप धावडे, विश्वास सूर्यवंशी, असलम सय्यद हे आणि इतर तरुण-तरुणी चर्चा, कविता, चित्रं, उपोषण अशा वेगवेगळ्या माध्यमांतून हा विचार समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
अमर हबीब हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक-संपादक पत्रकार व लेखकही आहेत. अंबाजोगाई शहरात होणार्या साहित्यिविषयक सर्व उपक्रमांत ते उपक्रमांच्या नियोजनासह सहभागी असतात. घाटनांदूर येथे होत असलेल्या पहिल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या साहित्य-चळवळीतील योगदानाचा बहुमान होत आहे.
जीवनात रंग भरणारी माणसे प्रत्येकाला भेटतात, त्यामुळे आयुष्याचे चित्र समृद्ध होतं. जीवनाचा नकाशा सुटसूटीत होतो, पण आयुष्याच्या नकाशाला यशापयशाच्या पलिकडचा उठाव देणारी माणसे भेटणे भाग्याचे. उठाव पूसता येत नाहीत. आदरणीय अमर काका, आपण अनेकांच्या आयुष्यात असा समाजभिमुख उठाव निर्माण केला आहे, करीत आहात. त्यातला एक मीही भाग्यवान.
प्रा. डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे, घनसावंगी, जालना.

About The Publisher
