बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा मुलमंत्राचा अवलंब करा - अब्दुल हफीज
जालना । प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला . त्याचे अनुकरण करून विखुरलेला बौद्ध समाज एकत्र आला. त्यांनी प्रगती केली, तेव्हा मुस्लिम समाजाने देखील या मुलमंत्राचा अवलंब करून एकत्र येऊन प्रगती करावी, असे आवाहन जालना विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पत्रकार अब्दुल हफीज यांनी येथे बोलताना केले.
Advertisment
जेंव्हा मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून सर्वधर्मीय समाजातील मित्र मला सांगताहेत की हफीजभाई तुम्ही जरी मुस्लिम समाजाचे आहात तरी तुम्ही जातीय चेहरा घेवून कधी वावरले नाही असे सांगून श्री.हफीज म्हणाले की मला गर्व आहे की या माझ्या जालन्याच्या जमिनीवर जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचा मी 16 वर्ष जिल्हाध्यक्ष पदावर कार्य केले.राज्याच्या इतिहासात याची नोंद घेण्यात आली आहे. माझ्यासाठी व मुस्लिम समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना मी प्रत्येक समाजासोबत जिव्हाळ्याचे संबंध जोपासले त्यामुळेच मी कालपासून सर्वधर्मीय मित्रांशी प्रत्यक्ष गाठी भेटी घेतोय तर सर्वांच्या प्रतिक्रिया एकच आहे की हफीजभाई निवडणूक निकालाच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी तुम्हीच आमदार होणार यात कोणाचेही दुमत नाही,असा विश्वास श्री.हफीज यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाहीत सर्वांना मतदानाचा अधिकार दिलाय. लोकशाहीत कोणत्या समाजाचे किती मतदान याचा अभ्यास केला जातो.यात आपल्या जालना विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज हा बहुसंख्येने आहे.तरी देखील विरोधक आपल्याला कमजोर समजतात.
कारण किती वर्ष उलटली आपण एकत्रितरित्या आपली ताकद दाखविली नाही. अशा प्रसंगी माझ्या संतप्त भावना व्यक्त होतात.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला तेंव्हा विखुरलेला समाज एकत्र आला.आपल्या समाजाने देखील या मुलमंत्राचा अवलंब करून एकत्र यावे,किती दिवस अन्याय सहन करायचा,असे ते म्हणाले.
जालना नगर पालिकेचे महानगरपालिकेत परावर्तीत झालीय, ज्यांच्या हातात नगर पालिकेचे सत्ता होती त्यांनी दलीत, मुस्लिम, अठरा पगड जातींच्या वसाहतीतील नागरी समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. सांड पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत, रस्त्यावर घाण वाहतेय, पिण्याचे पाण्याचे नियोजन नाही,गरीबांच्या घरांसाठी पी.आर.कार्ड नाहीत, पथ दिवे नाहीत अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत नागरिक आहे त्याच स्थितीत राहतात,असे सांगून श्री.हफीज म्हणाले की, प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी येणार्या 20 नोव्हेंबर रोजी कोणाच्याही भुल थापांना आणि अमिषाला बळी न पडता माझ्या सात किरणांसह पेनाची निब या निशाणीपुढील बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा,असे आवाहन अपक्ष उमेदवार पत्रकार अब्दुल हफीज यांनी यावेळी केले.