जालना । प्रतिनिधी - आधुनिक युगात बदलेल्या जीवनशैलीमुळे मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशीराने झोपतात व सकाळी लवकर उठतात. त्यामुळे त्यांची झोप पुरेशी होत नाही. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असल्याने इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता अथवा त्यानंतर भरण्यात यावे, या सहा महिन्यापूर्वीच्या शासन निर्णयाला शाळांनी हरताळ फसला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होत आहेच; शिवाय पालकांची तारांबळ उडत आहे. शिक्षण विभागाने तात्काळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून, सकाळी 9 वाजेपूर्वी म्हणजे सात वाजेपासून वर्ग भरणार्या सर्व माध्यमांच्या शाळा, शिक्षण संस्थांवर कारवाई करावी; अन्यथा मराठा महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला आहे.
यासंदर्भात अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष ड. शैलेश देशमुख, कामगार आघाडीचे अंबड तालुका अध्यक्ष मोबीन बागवान, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ जोगदंड यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा 9 नंतर भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये घेऊन, तसा जीआरदेखील काढलेला आहे. त्यात म्हटले आहे की, सकाळी सात वाजता शाळेमुळे विद्यार्थ्यांना सहा वाजताच उठावे लागते. मुलांचा डब्बा, त्यांची तयारी यासाठी पालकांनाही कसरत करावी लागते. झोप होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिडचिड होते, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. पावसाळा, हिवाळा, बदलेले वातावरण यांमध्ये लहान विद्यार्थांना शाळेत जावे लागते.
या वातावरणमूळे लहान विद्यार्थ्याँना त्रास होतो व पालकांची देखील धावपळ होते. मुलांना तयार करणे , शाळेत वेळेत पोहचणे. थंडीच्या तसेच पावसाच्या दिवसांत विद्यार्थ्यांना बस, व्हॅन, रिक्षा या साधनानी शाळेत जावे लागते व या दिवसांमध्ये धूके मोठया प्रमाणात पडते व अपघात होतात. या सर्व समस्या बघून सरकारी नियम आणि सरकारी कार्यालयाच्या वेळा व राज्यातील शाळांच्या वेळा समान येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सर्वांचा विचार करून व तपासून शासनने राज्यातील चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजता किंवा त्यानंतर शाळांच्या सोयीनुसार भरविण्याचा निर्णय घेतलेला असताना कुणीच शासन निर्णयाची दखल घेतलेली नाही. शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक आणि पालकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाच्या परिपत्रात नमूद आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मुलांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
नैसर्गिक झोप पूर्ण होऊन मुलांचे लक्ष एकाग्र होण्यास आणि अभ्यासाला प्रेरणा देण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे. या मुलांचे पालकही उत्तम दिनचर्या आणि निश्चिंत प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. लहान मुलांचा सांभाळ करणार्या पालकांची तारेवरची कसरत यामुळे काहीशी कमी होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर निश्चितच सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा निर्णय हातभार लावणारा असल्याने शिक्षण विभागाने तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंद देशमुख यांनी दिला आहे.