जालना । प्रतिनिधी - शहरातील सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरात भरविण्यात येणारा मीना बाजार यंदा भरविण्यास जालना शहर महानगर पालिकेच्यावतीने सक्त मनाई करण्यात आली आहे. मीना बाजार भरविल्यास पोलीस प्रशासनासह मनपाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
मनपाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते यांनी सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरातील भरविण्यात येणार्या मीना बाजार बंद करण्याबाबत मा. उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक 4726/2003 दाखल झालेली आहे. याबाबत मा. न्यायालयाने दिनांक 09.10.2024 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार शहरात मीना बाजार भरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
त्यामुळे फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते यांनी सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरात विक्री व्यवसाय करु नये, विक्री व्यवसाय करतांना आढळून आल्यास पोलीस प्रशासन व जालना शहर महानगर पालिकातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद आहे. दोन दिवसांपुर्वीच व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने बाजार न भरण्यासंदर्भात मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊनच मनपा प्रशासनाच्यावतीने मीना बाजार भरविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मनपाने मनाई केली असली तरी यास फेरीवाले, हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते किती प्रतिसाद देतात हा मोठा प्रश्न आहे. त्यानंंतर मनपाकडुन नेमकी काय कारवाई करण्यात येईल हे देखील पुढे स्पष्ट होईलच.