नागरी समस्यांवर शिवसेना आक्रमक; जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन
जालना । प्रतिनिधी - जालना शहरातील नागरी प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण करू लागले आहेत. नुकत्याच काही दिवसापूर्वी जालन्यातील भवानीनगर येथील रस्त्याने जाणार्या एका चिमुकल्या सात वर्षाच्या मुलाला सात-आठ मोकाट कुत्र्यांनी घेरुन हल्ला केला. या मोकाट कुत्र्यांनी त्या चिमुकल्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहे. चिमुकल्याच्या शरीरावर झालेला जखमांवर 160 टाके पडले. मात्र सुदैवाने तो बचावला. ही घटना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी महानगर पालिकेच्या आवारात सांगितली तेंव्हा सर्व वातावरण स्तब्ध व भावनिक झाले होते. तर शहरात रस्त्याच्या मधोमध असणार्या विद्युत खांबांनीही एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला. यासह पाणी, स्वच्छता असे नागरी प्रश्न घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आपल्या सहकार्यांसह महानगरपालिकेवर धाव घेतली. तेथे शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली व शहरातील नागरी प्रश्नांकडे पालिकेचे होणारे दुर्लक्ष यावर होळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बोंबा ठोकल्या.
शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आक्रमकपणे घोषणा देऊन प्रशासनाने समस्या सोडण्याची जोरदार मागणी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी उपस्थित पालिकेचे अधिकारी सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे व प्रियंका राजपूत यांच्यावर समस्यांचा भडीमार केला. यावेळी अंबेकर म्हणाले की, जालना महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवांचे काही देणे घेणेच राहिलेले नाही. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण करीत आहेत. त्यावर वाहनाधारक धडकून एका निरापराध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही ते विद्युत खांब अजून हलवले नाहीत ते तात्काळ हलविण्यात यावेत. नागरिकांना दिले जाणारे पाणी अत्यंत अनियमित स्वरूपाचे दहा ते बारा दिवसाआड याप्रमाणे महिन्यात तीन वेळा तर वर्षभरात तीस ते पस्तीस दिवस देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. तर पाणीपट्टी मात्र 700 रुपयांवरून 2 हजार 700 केली असून वसुलीही नोटीसा देऊन सक्ती न करण्याची मागणी करुन उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. शहरातील अनेक विभागांमध्ये कचर्यांचे मोठ-मोठे ढीग साचले आहेत, नाल्या कुटुंब भरून रस्त्यावर वाहत आहेत. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. अनेक विभागात घंटागाडी अत्यंत अनियमितपणे जाते त्यांचेही योग्य नियोजन करून स्वच्छता करण्यात यावी असे अंबेकर म्हणाले.

यावेळी दलित आघाडीचे शहरप्रमुख संजय रत्नपारखे, वसीम खान, चेतन भुरेवाल, सखावत पठाण, जीवन खंडागळे, किशोर नरवडे, राजू वैद्य, तुकाराम भुतेकर, गणेश लाहोटी, दर्शन चौधरी, आकाश टेकुर, अजय रोडीये, सुनील तोडकर, पाऊलबुद्धे, सोनाजी खांडेभराड, योगेश जाधव, संतोष क्षत्रिय, इम्रान, शिवा मुळे, बळीराम शिंदे, जितेंद्र रत्नपारखे, गौतम साळवे, चंदा चव्हाण, रूपाली पवार, रंजना सरोदे, ज्योती वाडेकर, अंजली आठवले, प्रतीक्षा गवळी, राजेश शेळके, राजू इंगळे, नितीन वानखेडे, वसंत मुंडे, मदनराव खरात, कैलास मिसाळ, गणेश तरासे, नितीन वानखेडे, रामेश्वर कुरील, कांतराव कुंडलकर, ज्ञानदेव पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.

About The Publisher
